डॉ. अशोक बालगुडे

दिल्ली : वयाच्या तेविसाव्या वर्षी काही तरुण करिअरची दिशा शोधत असतात, तर काहींनी आपली दिशा जगाला दाखवलेली असते! भारतीय वंशाचे यश पाटील हे त्यापैकीच एक. त्यांच्या ‘अप्लाइड कम्प्युट’ या कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील स्टार्टअपचे जागतिक सायबर सुरक्षा क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘पालो अल्टो नेटवर्क्स’कडून तब्बल 4.5अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 42 हजार कोटी रुपयांच्या मूल्यावर अधिग्रहण होणार आहे. अवघ्या 23 व्या वर्षी यश यांनी जागतिक व्यावसायिक विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.
यश पाटील हे केवळ कंपनीचे सह-संस्थापक नाहीत, तर तिचे मुख्य कार्यकारी अधिकारीही आहेत. रिदम गर्ग आणि लिंडन ली यांच्या सहकार्याने त्यांनी ‘अप्लाइड कम्प्युट’ची स्थापना केली. प्रत्येक कंपनीकडे स्वतःची कृत्रिम बुद्धिमत्ता क्षमता असावी, या कल्पनेतून त्यांनी या उद्योगाची पायाभरणी केली. कल्पनेचे तंत्रज्ञानात आणि तंत्रज्ञानाचे अब्जावधी डॉलरच्या व्यवसायात रूपांतर करण्याची किमया त्यांनी साधली.

19 नोव्हेंबर रोजी यश यांनी ‘एक्स’वर या व्यवहाराची माहिती दिली. हा संपूर्ण व्यवहार शेअर्सच्या स्वरूपात होणार आहे. अधिग्रहण पूर्ण झाल्यानंतर यश पाटील हे पालो अल्टो नेटवर्क्समध्ये सह-मुख्य कृत्रिम बुद्धिमत्ता अधिकारी (Co-Chief AI Officer) म्हणून जबाबदारी स्वीकारणार आहेत.
विशेष म्हणजे, जगभरातील कंपन्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या स्पर्धेत उतरल्या असताना यश यांनी वयाचा अडसर न मानता स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांचा हा प्रवास भारतीय तरुणांच्या कल्पकतेची, धाडसाची आणि उद्योजकीय क्षमतेची साक्ष देणारा आहे.
आपल्याकडे तरुणांनी आधी अनुभव मिळवावा, मग उद्योग करावा, असा सल्ला दिला जातो. पण यश पाटील यांनी अनुभवाची वर्षे मोजण्याऐवजी कल्पनेची उंची किती असू शकते, हे दाखवून दिले. वय 23 वर्षे; पण स्वप्नांची उंची अब्जावधी डॉलरची! भारतीय बुद्धिमत्तेला संधी मिळाली, तर ती जगाच्या बाजारपेठेत केवळ टिकत नाही, तर नेतृत्वही करू शकते, हेच यश पाटील यांनी सिद्ध केले







