Technology News : पुणे : कोरोनानंतर काही काळातच अमेरिका, चीन, आणि युरोपमधील काही देशांनी ५ जी इंटरनेट सेवा सुरु केली होती. तेव्हा कुठे भारत त्याची तयारी करत होता. इतर देशांच्या तुलनेत भारताची उशिराने एन्ट्री झाली. माञ, फार कमी काळात भारताने एवढी मोठी झेप घेतली की, जगातील पहिल्या पाचात भारत जाऊन बसला आहे.
एका वर्षात भारताची ही कामगिरी
भारताची प्रगती : 5Gची सर्वाधिक उपलब्धता असलेल्या देशात भारताचा पहिल्या पाचात नंबर लागत आहे. एका वर्षातच भारताने ही कामगिरी केली आहे. यामुळे भलेभले विकसित देश यामध्ये मागे पडले आहेत. भारतात सध्या तीन कंपन्या फाईव्ह जी सेवा देतात. यात एअरटेल, रिलायन्स आणि जिओ कंपनीचा समावेश आहे. १ ऑक्टोबर २०२२ ला पहिल्यांदा एअरटेलने फाईव्ह जी सेवा सुरु केली होती. त्यानंतर काही दिवसांनी रिलायन्स जिओने सुरु केली. यात, व्होडाफोन आयडिया आणि बीएसएनएल या कंपन्यांनी अद्याप फाईव्ह जी कडे ढुंकूनही पाहिलेले नाही.
आगामी काळात प्रगती वाढेल : एअरटेल आणि जिओ या कंपन्यांची फाईव्ह जी सेवा अद्याप मेट्रो आणि मध्यम शहरांमध्येच पोहोचल्या आहेत. तालुकापातळीवरील छोटी शहरे, गावे अद्याप यापासून लांबच आहेत. तरी देखील भारताने पहिल्या पाचात स्थान मिळविले आहे. जेव्हा आणखी काही महिन्यांत सर्व देश व्यापला जाईल तेव्हा भारताचा पहिला किंवा दुसरा क्रमांक असेल, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
29.9 टक्के लोकसंख्येकडून 5Gचा वापर : वर्ल्ड स्टॅटिस्टिक्सच्या एक्स हँडलवरून याबाबत एक ट्विट करण्यात आले आहे. यानुसार भारताने सर्वाधिक 5G उपलब्धता असलेल्या टॉप-5 देशांच्या यादीत स्थान मिळवले आहे. 29.9 टक्के 5G उपलब्धतेसह भारत या यादीत 5 व्या स्थानावर आहे. चौथ्या क्रमांकावर सिंगापूर 30 टक्के आहे. तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका असून 31.1 टक्के लोकांना 5G कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून दिली आहे. दक्षिण कोरिया 42.9 टक्के सह दुसऱ्या स्थानावर आहे, तर पोर्तु रिको पहिल्या स्थानावर आहे. त्यांच्या देशातील 48.4 टक्के लोकांकडे 5G कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे. या यादीत चीनचा समावेश करण्यात आलेला नाही.