नवी दिल्ली : सध्या इंटरनेटचा वापर वाढला आहे. त्यातच नोटाबंदीनंतर अनेक डिजिटल व्यवहारांना प्राधान्य दिलं जात आहे. हीच संधी लक्षात घेऊन सायबर गुन्हेगारही चांगलेच ‘अॅक्टिव्ह’ झाले आहेत. नवनवीन युक्त्या वापरून लोकांची फसवणूक केली जात आहे. त्यातच सध्या Digital Arrest च्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पण हा स्कॅम नेमका होतो कसा? त्यापासून वाचायचं कसं? याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
Digital Arrest हा एक सायबर फसवणुकीचा प्रकार आहे. लोकांचे शोषण करण्याचा हा एक नवीन आणि धोकादायक मार्ग आहे. Digital Arrest समजण्याआधी, कायद्यात अशी कोणतीही संज्ञा किंवा तरतूद नाही हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. Digital Arrest ही सायबर गुन्हेगारांद्वारे वापरली जाणारी फसवी युक्ती आहे. यामध्ये अनेकदा फोनवर किंवा ऑनलाईन डिजिटल माध्यमांद्वारे एखाद्या व्यक्तीला अटक करण्याचे खोटे दावे केले जातात.
लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करणे हाच यामागचा उद्देश आहे, त्यानंतर पीडितेला तो गुन्हेगारी कृत्यांमध्ये सामील असल्याचे धमकावले जाते आणि शेवटी त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जातात. ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने अवलंबली जाते, जेणेकरून पीडितेला घटनेनंतर कधीही गुन्ह्याची तक्रार करता येणार नाही.
अशी होते त्याची सुरुवात…
या संपूर्ण घोटाळ्याची सुरुवात एका साध्या मेसेज, ई-मेल किंवा व्हॉट्सॲप मेसेजने होते. ज्यामध्ये पीडित कोणत्या ना कोणत्या गुन्हेगारी कारवायांमध्ये गुंतलेली असल्याचा दावा करण्यात आला आहे. यानंतर त्याच्यावर व्हिडिओ किंवा फोन कॉलद्वारे काही प्रक्रिया पार पाडण्यासाठी दबाव आणला जातो आणि खात्री करण्यासाठी अनेक प्रकारची माहितीही मागवली जाते. असे कॉल करणारे स्वतःला पोलिस, अंमली पदार्थविरोधी अधिकारी, सायबर सेल पोलिस, आयकर किंवा सीबीआय अधिकारी म्हणून भासवतात. त्यामुळे यापासून दूर राहावे.
असा करता येईल स्वत:चा बचाव…
Digital Arrest टाळण्यासाठी काही गोष्टींची खबरदारी घेतल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते. त्यासाठी एखाद्याने पहिल्या टप्प्यावर थांबले पाहिजे आणि वैयक्तिक माहिती कधीही शेअर करू नये. शक्य असल्यास, स्क्रीनशॉट किंवा रेकॉर्डिंग घेतले पाहिजे.
तसेच कोणतीही सरकारी संस्था कधीही फोनवरून अशाप्रकारच्या धमक्या देत नाही आणि व्हिडिओ कॉलद्वारे त्यांची चौकशी करून पैशांची मागणी करत नाही. त्यामुळे असा कोणताही प्रकार घडला की समजूजा की हा काहीतरी घोटाळा अथवा स्कॅम आहे. अशा फसवणुकीची तक्रार करायला विसरू नका. त्यासाठी सायबर हेल्पलाईन नंबर 1930 डायल करून आणि www.cybercrime.gov.in या मेलवर माहिती देता येऊ शकते.