पुणे : राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. तापमानात मोठी घट झाली आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी कपाटात ठेवलेले गरम कपडे आता बाहेर निघू लागले आहे. पुढील काही दिवसांत राज्यात सर्वदूर थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, हिमालय क्षेत्रासह उत्तर भारतात पश्चिमी झंझावात अर्थात एक तीव्र थंड हवेचा झोत सक्रीय असल्यामुळं उत्तर भारतात थंडी वाढली आहे. याच उत्तर भारतीय राज्यांमधून येणाऱ्या वाऱ्यामुळे राज्यभरात थंडीचं प्रमाण येत्या दिवसात वाढण्याचे संकेत मिळत आहेत. राज्याच्या किनारपट्टी क्षेत्रामध्येही वातावरणात बदल झाले असून, किमान आणि कमाल तापमानाच घट होताना दिसत आहे.
पुणे शहरात 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोदं झाली आहे. तसेच रत्नागिरीत 35 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. नाशिकमध्ये तापमान 12.4 अंशांवर पोहोचला आहे, तर जळगावात 13.2 अंश सेल्सिअस, महाबळेश्वरमध्ये 13.2 अंश, साताऱ्यात 14.5 अंश, कोल्हापुरात 17.2 अंश इतकं तापमान आहे. विदर्भातही हीच स्थिती असून, नागपुरात पारा 13.6 अंश, गडचिरोली इथं 14 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. या तापमानातही घट होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या तापमानात विशेषत: किमान तापमानात कमालीचा बदल होत आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीचा कडाका वाढत असून, पश्चिम महाराष्ट्रातही तो जाणवत आहे.