मोहोळ: पैशाच्या कारणावरून धमकी देऊन, तुझ्यामुळे माझ्या घराचे वाटोळे झाले आहे, मी तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत मसले चौधरी (ता. मोहोळ) येथील ३९ वर्षीय व्यक्तीची धारदार हत्याराने डोक्यात वार करीत पोटात भोसकून खून केल्याची घटना ११ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान टाकळी सिकंदर गावाच्या हद्दीत घडली. याप्रकरणी हॉटेल मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजयकुमार हरिदास शिरसट असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयकुमार शिरसट हे कुटुंबासमवेत मोहोळ तालुक्यातील मसले चौधरी येथे राहतात. ते दत्तगुरुची पूजाअर्चा करून लोकांना त्यांच्या घरातील तसेच व्यवसाय याविषयी चांगली वाईट माहिती सांगत होते. त्यामुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसला होता. गेल्या दोन वर्षांपूर्वी मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील हॉटेल व्यवसायिक दत्ता वसेकर हे शिरसट यांच्याकडे गेले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या घरातील अडचणी व त्यांचा हॉटेल व्यवसाय चालत नव्हता, असे सागितले. त्यावर शिरसट यांनी उपाय सांगितल्यावर त्याचा त्यांना फायदा झाला. म्हणून वसेकर हा परत परत शिरसट यांच्याकडे येऊ लागला.
त्यातच वसेकर यांची पत्नी एक वर्षापूर्वी मयत झाली होती व त्यातूनच तो थोडा तणावात होता. त्याचा व्यवसाय ही हळूहळू चालत होता. म्हणून दत्ता वसेकर हा शिरसट यांच्या घरी दोन महिन्यापूर्वी येऊन गेला होता. वसेकर याचा फोन आल्यानंतर विजयकुमार शिरसट हे मानसिक तणावात यायचे, त्यातूनच गेल्या दोन दिवसांपासून ते जास्तच मानसिक तणावात होते. त्यांच्या पत्नी फिर्यादी सुषमा शिरसट यांना विजयकुमार शिरसट यांनी सांगितले होते की, दत्ता वसेकर हा पैशाच्या कारणावरून धमकी देत होता. त्यादरम्यान ११ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास विजयकुमार शिरसट हे घरातून चिंचोली (ता. पंढरपूर) येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी दुचाकीवरून गेले होते.
सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या दरम्यान दत्ता वसेकर याने त्याच्या हॉटेल जवळ विजयकुमार शिरसट यांना वरील कारणावरून कोणत्यातरी हत्याराने डोक्यात वार करून पोटात भोकसून त्यांचा खून करून पळून गेला, असल्याची फिर्याद सुषमा शिरसट यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दत्ता वसेकर (रा. टाकळी सिकंदर) याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत करीत आहेत.