बार्शी : शहरातील गवत गल्ली येथील पवार भेळ दुकानाच्या वरच्या मजल्यावर एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना १७ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता उघडकीस आली. विलास हनुमंत पवार (वय २९, रा. पवार भेळ, गवत गल्ली, बार्शी) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत सागर पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, विलास हा येथील भेळचे दुकान चालवत होता व तो तेथेच राहत होता. सागर हा १७ रोजी सकाळी ९ वाजता नेहमीप्रमाणे भेळच्या दुकानात गेले असता, विलास हा दुकानची साफसफाई करत होता. त्यानंतर सागर पवार घराकडे परतला. सकाळी १०.३० वाजता त्यांचे चुलते संपत भीमराव पवार यांनी फोन करून विलासने गळफास घेतल्याची माहिती सागर यास दिली. सागर पवार व त्यांचा मित्र गिरीष नायकोजी घटनास्थळी पोहोचले असता, विलासने छताला शॉलच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.







