बीड: जालना अँटी करप्शन ब्युरोने बीडमध्ये लाचखोरीविरोधात मोठी कारवाई करत एका अधिकाऱ्याला रंगेहात पकडले आहे. कपिल भिमराव कांबळे (वय 43) हे बाल निरीक्षण गृह, बीड येथे कनिष्ठ संरक्षण अधिकारी असून अतिरिक्त अधीक्षक पदभार सांभाळत होते. त्यांनी सिक्युरिटी गार्डची ऑर्डर काढून देणे आणि दर महिन्याला हजेरी अहवाल कंपनीला पाठवण्यासाठी तक्रारदाराकडून 45000 रुपये लाच मागितल्याचे समोर आले आहे.

तक्रारदार हे पुण्यातील स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीमार्फत बीड येथे सिक्युरिटी गार्ड म्हणून कामावर होते. त्यांच्या हजेरीची नोंद आणि पगारासाठी आवश्यक अहवाल पाठवण्याचे काम कांबळे यांच्याकडे होते. त्यासाठीच त्यांनी पैशांची मागणी केली होती. मात्र तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत 13 एप्रिल 2026 रोजी अँटी करप्शन ब्युरो, जालना येथे तक्रार दाखल केली.
या तक्रारीनंतर बी. एस. जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. पंचांसमक्ष पडताळणीत कांबळे यांनी 30000 रुपये तत्काळ आणि उर्वरित 15000 रुपये नंतर घेण्याचे मान्य केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार बीडमधील पालवण चौकात त्यांच्या कारमध्ये सापळा कारवाई करण्यात आली. तिथे त्यांनी 30000 रुपये स्वीकारताच पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले.
या कारवाईत बाळु जाधवर आणि त्यांच्या पथकातील अंमलदारांचा सहभाग होता. आरोपीची अंगझडती घेतली असता 30000 रुपये, 100 रुपये अतिरिक्त रोख, एक मोबाईल आणि दोन सोन्याच्या अंगठ्या जप्त करण्यात आल्या.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अँटी करप्शन ब्युरोकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणीही शासकीय कामासाठी लाच मागितल्यास तात्काळ माहिती द्यावी.






