पंढरपूर: पंढरपूरात एका तरुणीवर भररस्त्यात ॲसिड हल्ला झाल्याच्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. मात्र, आता या प्रकरणाचा तपास करताना पोलीसही चक्रावून गेले आहेत. प्राथमिक तपासातून समोर आलेली माहिती अतिशय धक्कादायक असून, हा हल्ला कोणत्याही अज्ञाताने केला नसून तरुणीने स्वतःच स्वतःवर ॲसिड ओतून घेतल्याचे समोर आले आहे.

नेमकं काय घडलं?
काही दिवसांपूर्वी पंढरपूर शहराच्या मध्यवस्तीत एका तरुणीवर ॲसिड हल्ला झाल्याची घटना समोर आली होती. एका अज्ञात व्यक्तीने चेहऱ्यावर ॲसिड फेकून पळ काढल्याचा दावा पीडितेने केला होता. या घटनेनंतर शहरात प्रचंड संताप व्यक्त केला जात होता आणि आरोपीला अटक करण्याची मागणी जोर धरत होती. पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली, सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि पीडितेचा जबाब नोंदवला.
पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा तांत्रिक तपास केला, तेव्हा काही गोष्टी संशयास्पद वाटू लागल्या. अधिक चौकशी आणि समुपदेशनानंतर पीडितेने स्वतःच ‘टॉयलेट क्लीनर’चे ॲसिड विकत घेतले आणि ते अंगावर ओतून घेतल्याचे सांगितले. त्यानंतर कोणीतरी हल्ला केल्याचा बनाव रचला.
पोलिस आता या कृत्यामागच्या कारणांचा शोध घेत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, हा प्रकार करण्यापूर्वी पीडितेने काही औषधे किंवा गोळ्या घेतल्या होत्या. दरम्यान, असे का केले होते याचाही शोध घेतला जात आहे. सध्या तरुणीवर उपचार सुरू असून तज्ज्ञांमार्फत तिचे समुपदेशन केले जात आहे.







