Pune News : पुणे : शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे पोलीस चौकीच्या अगदी जवळ सुरू असलेल्या अवैध मटका अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. दिवसाढवळ्या सुरू असलेल्या या प्रकारामुळे परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वढू रस्त्यालगत खुशबू पान शॉपसमोर एका हॉटेलच्या शेडमध्ये ‘कल्याण’ नावाचा मटका खेळवला जात होता. या बाबतची माहिती एलसीबीला मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत आणि त्यांच्या पथकाने अचानक छापा टाकला. छाप्यावेळी काही जण कागदावर आकडे लिहून मटका खेळवत असल्याचे आढळून आले.

या कारवाईत पोलिसांनी मटक्याशी संबंधित साहित्य आणि रोख रक्कम असा सुमारे 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी मटका चालक, जागा मालक आणि इतर सहभागी अशा एकूण 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरुण वानखेडे, दत्तात्रय कान्हूरकर, ज्ञानेश्वर थोरात, अविनाश शिवले, विराज आलम, कुंडलिक राठोड, सोमनाथ माने, वसंत सुपेकर, परमेश्वर शिंदे, श्रीमंत आबा पाटील, दत्ता वारघडे आणि राऊतमामा अशी आरोपींची नावे आहेत.
विशेष म्हणजे हा अवैध प्रकार पोलीस चौकीपासून अगदी जवळ सुरू असतानाही स्थानिक पोलिसांना याची माहिती नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अखेर स्थानिक गुन्हे शाखेला हस्तक्षेप करून ही कारवाई करावी लागली.
या कारवाईनंतर परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी अशा कारवाया पुढेही सुरू ठेवणार असल्याचे संकेत दिले आहेत.







