मोहोळ : मोहोळ तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शेतातील बोरच्या पेटीत विद्युत प्रवाहाचा धक्का लागून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना आज (दि. ०२) सकळी ११ वाजण्याच्या सुमारास मोहोळ तालुक्यातील रामहिंगणी गावच्या हद्दीत पाटील वस्तीवर घडली आहे. राजवर्धन उर्फ सुशांत नारायण पाटील (वय-३२) असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामहिंगणी गावच्या हद्दीत राजवर्धन हा कुटुंबासोबत राहतो. शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शेतातील बोरच्या लाईटच्या पेटीजवळ राजवर्धनला विद्युत प्रवाहाचा धक्का लागून तो खाली कोसळला. त्याला तात्काळ मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, भाऊ हर्षवर्धन पाटील यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात खबर दिली असून पोलिसांनी शेतातील बोरच्या पेटीजवळ विद्युत प्रवाहाचा धक्का लागून मृत झाल्याप्रकरणी नोंद केली आहे. या घटनेचा अधिक तपास मोहोळ पोलीस करीत आहेत.
मित्रपरिवार व नातेवाईकांनी रुग्णालयात केली गर्दी
सुशांत पाटील हा मोहोळ येथील जय महाराष्ट्र प्रतिष्ठानने राबवलेल्या प्रत्येक सामाजिक कार्यात पुढाकार घेऊन सामील होत होता. त्याला विद्युत प्रवाहाचा धक्का लागल्याची बातमी कळताच त्याच्या मित्रपरिवार व नातेवाईकांनी मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. मृत सुशांत पाटील याच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, भाऊ, भावजय असा परिवार आहे.