सांगली : देशभरात लोकसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला महाराष्ट्रातील सांगली लोकसभा मतदारसघांत तिरंगी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक अर्ज दाखल केला होतं. दाखल केलेला अर्ज माघार घेण्यासाठी आज शेवटचा दिवस होता. मात्र, विशाल पाटील यांनी आपला अर्ज माघार घेतला नसून निवडणूक लढण्यावर ते ठाम आहेत. त्यामुळे सांगली लोकसभेसाठी आता तिरंगी लढत होण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
विशाल पाटलांनी मागितली शिट्टी मात्र, मिळालं हे चिन्ह
उमेदवारी अर्ज निश्चित झाल्यानंतर विशाल पाटील यांना कोणतं चिन्ह मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अशातच सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात अपक्ष उमेदवाराना चिन्हाचं वाटप करण्यात आलं. यावेळी विशाल पाटील यांना लिफाफा हे चिन्ह बहाल करण्यात आलं.
दरम्यान, विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज भरताना शिट्टी, टेबल आणि गॅस सिलेंडर या चिन्हांची मागणी केली होती. मात्र, मागणी केलेल्या तिन्ही चिन्हांपैकी विशाल पाटील यांना एकही चिन्ह मिळालं नसून त्यांना लिफाफा हे चिन्ह देण्यात आलं आहे. त्यांनी मागितलेलं शिट्टी हे चिन्ह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार महेश खराडे यांना मिळालं आहे.
कॉंग्रेसकडून निलंबनाचा इशारा
अखेरच्या दिवशी विशाल पाटील उमेदवारी अर्ज माघार घेणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष होते. मात्र, विशाल पाटील यांनी अर्ज माघार घेतला नाही. काँग्रेसकडून आघाडी धर्म पाळण्यासाठी विशाल पाटील यांना निलंबनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र, विशाल पाटील यांनी दुर्लक्ष करत उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार निवडणूक लढवीत असताना काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी उमेदवारी परत न घेतल्यामुळे आघाडीत नाराजीचा सूर उमटत आहे.