कोतवाली (नगर) : पिण्याचे पाणी मागण्याच्या बहाण्याने वाहने थांबवून वाहनचालकांना मारहाण करून लुटणाऱ्या दोघांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अविनाश विश्वास जायभाय (रा. दुधसागर सोसायटी, केडगाव, अहमदनगर), अजित रामदास केकाण (रा. सारसनगर, अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्यांचे आणखी साथीदार फरार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.
कोतवाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. ३०) पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास अहमदनगर शहरात करपे वीट भट्टीजवळून आशीर्वाद कॉलनीकडे जाताना फिर्यादी अफताब नवाब बागवान (रा. हातमपुरा, अहमदनगर) हे त्याच्या नातेवाईकासह निघाले होते. या वेळी त्यांच्या वाहनाला थांबवून पाण्याच्या बाटलीची मागणी करण्यात आली. पाणी दिले नाही या कारणावरुन लोखंडी रॉड, लाकडी दांड्याने मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच गाडीतील सव्वा दोन लाख रुपये किमतीची रोख रक्कम व १० हजार रुपये किमतीच्या मोबाईल फोनसह इतर साहित्य चोरून नेल्याची घटना घडली.
याप्रकरणी अफताब बागवान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अविनाश जायभाय, अजित केकाण यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली. ही कामगिरी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक अश्विनी मोरे, पोलीस हवालदार प्रमोद लहारे, रवींद्र टकले, तानाजी पवार, सत्यजीत शिंदे, दीपक रोहोकले यांनी केली.