पाचगणी (सातारा) : वाई-पाचगणी मुख्य मार्गावर दांडेघर बस थांब्या नजिक राज्य मार्गाच्या कडेला संरक्षक भिंत आज पहाटे कोसळली आहे. संरक्षक भिंतीच्या कडेला असलेल्या सिल्व्हर ओक झाडांच्या मुळ्या उघड्या पडल्याने ही झाडे धोकादायक बनली आहेत. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पाचगणी -वाई मार्गावर मुख्य रस्त्याच्याकडेला असलेल्या एका बंगल्याची संरक्षक भिंत कोसळली आहे. आठ ते दहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आज पहाटे तीनच्या सुमारास मुख्य मार्गावर ही भितं कोसळली. त्यामुळे या राज्य मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. ही माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सकाळी सहाच्या सुमारास जेसीबीच्या साह्याने रस्त्यांवरील राडारोडा हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत चालू झाली.
या संरक्षक भिंतीच्या कडेला असलेल्या सुमारे 9 सिल्व्हर ओकच्या झाडांना धोका निर्माण झाला आहे. ही झाडे धोकादायक झाली असून ते केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत असल्याने येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. संबंधित विभागाने हा धोका त्वरित दूर करून नागरिकांचा प्रवास सुरक्षिततेचा करावा, अशी मागणी केली जात आहे.