लहू चव्हाण
पाचगणी : पांचगणी येथील फायनल प्लॉट नंबर ५५५ या मिळकतीत बांधलेली इमारत ही रहीवासासाठी असताना तिचा बिनदिक्कतपणे व्यवसायासाठी वापर केल्याचे निदर्शनास आल्याने पांचगणी नगरपालिकेने हॉटेल दि फर्न ही इमारत मे महिन्यात कडेकोट बंदोबस्तात सील केली होती. परंतु इमारतीच्या मागील बाजूकडील सिल तोडून संबंधितांनी आत प्रवेश केल्याचे निदर्शनास आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पालिका प्रशासनाने याबाबत पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.
निवासासाठी असणारी इमारत व्यावसायासाठी वापरणाऱ्या पांचगणी येथील हॉटेल द फर्नला जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मे २०२४ मध्ये सील ठोकल्याने एकच खळबळ उडाली होती. परंतु त्यानंतर संबंधित हॉटेल चालकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, परंतु ती ही उच्च न्यायालयाने फेटाळून लावत याचिकाकर्त्यांना १० लाखाचा दंड ठोठावला होता.
चांदणी रियाल्टी यांनी मिळकतीचे सीलबंद केलेल्या कारवाई बाबत पाचगणी नगरपालिके विरोधात मा. न्यायालयात दाद मागितली होती. ही याचिका फेटाळताना उच्च न्यायालयाने मुख्य इमारतीच्या टेरेसवरील विनापरवाना शेड ३ महिन्याचे आत त्यांनी स्वतः स्वखर्चाने काढून घ्यावे. आणि इमारतीचा वापर मंजूर नकाशात दाखवल्याप्रमाणे स्लोपिंग रूफ करावे. फायनल प्लॉट नंबर ५५५ मधील फक्त मुख्य इमारतीचे सील काढण्यास न्यायालयाने परवानगी दिली होती. तर मागील बाजूला असणारी सर्व्हे नंबर 14/A/2 चे मिळकतीचे सीलबंद कायम राहणार होती.
परंतु, मुख्य इमारतीचे सील काढताना सदर इमारत वापर हा फक्त रहीवांसासाठीच करणे बंधनकारक राहणार होता. पालिकेचे कर्मचारी पाहणी करण्यासाठी गेले असता सीलबंद इमारतीचे सिल तोडून मागील बाजूने संबंधितांनी आत प्रवेश करून आपले व्यवहार सुरू ठेवल्याचे निदर्शनास आल्याने पालिका प्रशासनाने पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला आहे. पाचगणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. फौ. रविंद्र कदम अधिक तपास करीत आहेत. आता यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.