बार्शी, (सोलापूर): बार्शी शहरातील बुरुड गल्ली परिसरात दिवसाढवळ्या तब्बल साडेचार लाख रुपयांची धाडसी घरफोडी करणाऱ्या आरोपीला बार्शी शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या 24 तासात अटक केली आहे.
नागेश राजु बगाडे (रा. बार्शी ता. बार्शी जि. सोलापुर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून चोरी केलेला 4 लाख 29 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती बार्शी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुरुड गल्लीत चोरी झाली होती. याप्रकरणी प्रविण शिवशंकर थळकरी रा. बुरुड गल्ली बार्शी, यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. अज्ञात चोरटयाने घरात कोणी नसताना बंद घराजाचा लाकडी दरवाजा उचकटुन घरात शिरून सोन्याचे दागिने चांदीच्या वस्तु, एक एल.ई.डी. टिव्ही व रोख रक्कम असा 4 लाख 29 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल चोरू नेला होता.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने बार्शी शहर पोलीस ठाणे कडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर व पोलीस अंमलदार यांना सदर गुन्हयाचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले होते. सदर घटनेचा पोलीस शोध घेत असताना सदर गुन्हा हा पोलीस रेकॉर्डवरील आरोपीने केले असल्याची माहिती पोलीस हवालदार खराडे यांना मिळाली होती.
सदर माहीतीवरून नागेश बगाडे याला ताब्यात घेवुन त्याचेकडे विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची माहिती पोलिसांना दिली. त्याचेकडे अधिक चौकशी केली असता सदराचा गुन्हा हा त्याने केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीला गेलेला 16 तोळे सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तु एक एल.ई.डी. टिव्ही व रोख रक्कम, 14 हजार रूपये असा 4 लाख 29 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी नागेश बगाडे विरुध्द मुंबई शहर, पुणे शहर तसेच बार्शी शहर पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगीरी पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांचे मार्गदर्शनाखाली बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो उप-निरीक्षक उमाकांत कुंजीर, सहायक पोलीस उपनिरीक्षक अजित वरपे, पोलीस हवालदार श्रीमंत खराडे, अमोल माने, बाळकृष्ण दबडे, बाबासाहेब घाडगे, पोलीस नाईक संगाप्पा मुळे, अंकुश जाधव, धनराज फत्तेपुरे, सचिन देशमुख, राहुल उदार, सचिन नितनात, अवि पवार, प्रल्हाद अकुलवार, इसामियाँ बहिरे गुन्हे प्रकटीककरण पथक बार्शी शहर पोलीस ठाणे यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक उमाकांत कुंजीर हे करीत आहेत.