लहू चव्हाण
पाचगणी : मका उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी ‘स्वीट कॉर्न’ हे वरदान ठरू शकेल, असा विश्वास मका पैदासकर डॉ. सुनिल कराड यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर येथील अखिल भारतीय समन्वित मका संशोधन प्रकल्पाच्या विद्यमाने महाबळेश्वर येथे आयेजित शेतकरी प्रशिक्षण वर्गात डॉ. कराड बोलत होते. या वेळी महाबळेश्वर केंद्राचे डॉ. मनीष सुशीर, डॉ. दर्शन कदम, डॉ. विक्रांत साळी, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे मंडल कृषी अधिकारी राजेंद्र डोईफोडे, महाबळेश्वर तालुका कृषी अधिकारी दीपक बोर्डे, धनाजी शिरगाव आदी मान्यवर उपस्थित होते.
सुनील कराड पुढे म्हणाले की, महाबळेश्वर परिसरात मका उत्पादनासाठी मोठा वाव आहे. मका पिकाचे महत्त्व लक्षात घेता पिकाचे क्षेत्र वाढविणे गरजेचे आहे. अॅग्रो टुरिझमसाठी मका पिकामधील स्वीट कॉर्न हे उपयुक्त पीक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी स्वीट कॉर्न पीक वाढीवर भर द्यावा. शिफारशीनुसार मका पिकाचे तंत्रज्ञान अवगत करून उत्पादन वाढवावे.
या कार्यक्रमात शेतकरी प्रशिक्षणार्थींना मक्याचे स्वीट कॉर्न “फुले मधू” वाण वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम मका संशोधन संस्था, लुधियाना यांच्या अनुदानातून साकार झाला. “फुले मधू मका” हे वाण शेतकरी प्रशिक्षणार्थींच्या प्रक्षेत्रावर संपूर्ण तंत्रज्ञान वापरून लागवड करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन दीपक बोर्डे यांनी केले. आभार राजेंद्र डोईफोडे यांनी मानले.