Sugar Factory : सातारा : यंदा उसाला साखर कारखान्यांनी एफआरपी व अधिकचे ५०० रुपये दर जाहीर करावे, अन्यथा शेतकऱ्यांच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे यांनी दिला. रयत क्रांती संघटनेच्यावतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
मागील वर्षीपासून साखरेचे भाव प्रतिक्विंटल तीन हजार ५०० ते चार हजार रुपये एवढे होते. ती सध्या तीन हजार ८०० रुपयांच्या जवळपास आहे. त्यामुळे साखर कारखान्यांचे साखरेपासून मिळणारे उत्पन्न वाढले आहे. मळी, बगॅस, मॉलेसिस या उपपदार्थांपासूनही उत्पन्न मिळते. त्याचबरोबर कारखान्यांनी इथेनॉल, डिस्टलरी, को-जनरेशनसारखे उपपदार्थांतूनही उत्पन्न मिळते. त्यामुळे मागील वर्षीची एफआरपी देऊनही साखर कारखाने शेतकऱ्यांना आणखी ५०० रुपये द्यावे. अशी माहिती निवेदनातून देण्यात आली आहे.
साखर उतारा १२ च्या पुढे १२.६० पर्यंत असल्याने मागील वर्षीचे ५०० रुपये देणे शक्य होणार आहे. ते साखर कारखान्यांनी तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावेत. ऊस नियंत्रण कायद्यानुसार साखर कारखान्यांनी कारखाने सुरू करण्यापूर्वी यावर्षीची आपली पहिली उचल जाहीर करणे बंधनकारक आहे; परंतु अद्यापही कारखान्यांनी आपली उचल जाहीर केलेली नाही.