सोलापूर: सोलापुरमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा वेळी झालेल्या तोडफोड प्रकरणी एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्या या तोडफोडप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोर्चात भाषणादरम्यान जर कोणी आक्षेपार्ह वक्तव्य केलं असेल तर त्यांच्यावरही रितसर कारवाई केली जाईल अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे आणि टी. राजा सिंग यांच्यावर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शनिवारी सोलापुरात हिंदु जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चासाठी भाजपचे आमदार नितेश राणे आणि तेलंगणातील भाजप आमदार टी राजा सिंह यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्या दरम्यान शहरातील काही दुकानांवर दगडफेक करून तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेमध्ये दुकानातील साहित्याचे नुकसान झाले असून एक जण किरकोळ जखमी झाला आहे.
हिंदू जन आक्रोश मोर्चा वेळी झालेल्या तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. या घटनेमध्ये एका व्यक्तीला ताब्यातही घेतले आहे. या मोर्चाच्या वेळेस पोलिसांनी या परिसरात कॅमेरे लावलेले होते. त्यामुळे फुटेज पाहून आणखी आरोपी निश्चित केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, हिंदू जनआक्रोश मोर्चासाठी आमदार नितेश राणे आणि आमदार टी. राजा सिंग या दोघांनाही पोलिसांनी नोटीस बजावलेली होती, अशी माहिती समोर येत आहे. भाषणादरम्यान जर कोणी आक्षेपर्ह वक्तव्य केलं असेल तर त्यांच्यावरही रीतसर कारवाई केली जाईल, अशी पोलीस सूत्रांनी माहिती दिली.