कोल्हापूर : राज्यात विधानसभा निवडणुकांची रेलचेल सुरु झाली आहे. अशातच कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने माजी नगरसेवक लाटकर यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसच्या तिसऱ्या यादीत त्यांचे नाव जाहीर होताच अज्ञातांकडून काँग्रेस कमिटीच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला आहे. शनिवारी रात्री साडे बारा वाजता कार्यलयावर दगडफेकीची घटना घडली असून या घटनेनंतर कार्यालयाच्या परिसरात शाहूपुरी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात केला आहे.
मविआत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला. पण पहिल्या दोन यादीमध्ये इथला उमेदवार निश्चित झाला नव्हता. परंतु काँग्रेसने शनिवारी रात्री उशिरा तिसरी यादी जाहीर केली. यात माजी नगरसेवक राजेश लाटकर यांना संधी देण्यात आली.
राजेश लाटकर यांना उमेदवारी मिळताच रात्री साडे बाराच्या सुमारास काही कार्यकर्ते स्टेशन रोडवर असणाऱ्या काँग्रेस कमिटी कार्यालयाबाहेर आले. कार्यालयावर दगडफेक करून काँग्रेसच्या चिन्हाला काळं फासलं. तसेच कार्यालयाच्या भिंतीवर ‘चव्हाण पॅटर्न, चव्हाण’ असं लिहिण्यात आलं आहे.
कोल्हापूर उत्तरमधून अनेकजण निवडणुकीसाठी इच्छुक होते. त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे यासाठी चर्चाही केली. पण राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर मविआसोबत राहिलेल्या राजेश लाटकर यांना उमेदवारी दिल्यानं नाराज झालेल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.