Solapur ZP School : सोलापूर : शालेय पोषण आहारात आता आज बुधवारपासून विद्यार्थ्यांना अंडी, पुलाव किंवा बिर्याणी यापैकी एक मिळणार आहे. अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केळी, चिकू, पेरू यापैकी एक फळ दिले जाणार आहे. आठवड्यातील बुधवार किंवा शुक्रवार या पैकी कोणत्याही एका दिवशी प्रतिविद्यार्थी पाच रुपयांप्रमाणे हा खर्च केला जाणार आहे.
स्थानिक बाजारातून खरेदी करण्याचे आदेश
आठवड्यात बुधवारी किंवा शुक्रवारी विद्यार्थ्यांना नवीन बदलानुसार आहार मिळेल, यादृष्टीने पोषण आहाराच्या योजनेसाठी पात्र ४ हजार ९५ शाळांच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात अंडी व फळांची खरेदी करायची आहे. अंडी खाणाऱ्या व न खाणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार करून त्यांना अंडी व फळे द्यायची आहेत. दिवाळी सुटीनंतर बुधवारपासून शाळा सुरु होणार असून विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी किंवा या आठवड्यातील शुक्रवारी नवीन बदलानुसार आहार मिळेल, असे जाहीर करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार जिल्हा परिषदेने इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळांना पत्राद्वारे माहिती दिली आहे. स्थानिक बाजारातून संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी अंडी व फळे विकत घ्यायची आहेत. त्यासाठी पहिल्या सहा आठवड्यांच्या खर्चापोटी प्रत्येक विद्यार्थ्याला ३० रुपये, याप्रमाणे अग्रिम दिला जाणार आहे.
कुकुटपालन, फळबागांना प्रोत्साहन
शासनाने केलेल्या या उपाययोजनांचा शेतकऱ्यांना देखील फायदा होणार आहे. एकीकडे विद्यार्थ्यांची शाळांमधील गळती कमी होईल, असा विश्वास आहे. दुसरीकडे गावात अंडी व फळे उपलब्ध असल्यास मुख्याध्यापक त्याची खरेदी करू शकणार आहेत. त्यातून स्थानिक पातळीवर कुक्कुटपालन व फळबाग लागवडीला प्रोत्साहन मिळणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी पाच रुपयांचा खर्च होणार असल्याने तेवढी रक्कम संबंधित शेतकऱ्याला जागेवरच मिळेल.