सोलापूर, (पुणे) : पुणे -सोलापूर (Solapur News) महामार्गावरील लांबोटी येथे सीना नदीचं पाणी महामार्गावर आल्यामुळे मंगळवारी (ता. 23) रात्री दहा वाजल्यापासून पुणे -सोलापूर महामार्ग बंद करण्यात आला आहे. यामुळे महामार्गावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तसेच बार्शी-कुर्डूवाडी या मार्गावरही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर सोलापुरातील तिऱ्हे गावाजवळही नदीच्या पुलावरून वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे सोलापूर-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकसुद्धा बंद केल्याची माहिती समोर आली आहे. सीना नदीचं पाणी ओसरेपर्यंत ही वाहतूक बंद राहण्याची शक्यता आहे. वाहतूक बंद असल्यानं दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले आहे. मराठवाड्यासह राज्यातील काही भागात पावसानं थैमान घातलंय. दुष्काळी गावांना अतिवृष्टीने झोडपल्यानं गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. नद्यांच्या पाणी पातळीत अभूतपूर्व अशी वाढ झाल्यानं अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे.
दरम्यान, सीना नदीला इतिहासात पहिल्यांदाच पूर आला आहे. सीना नदीच्या पुरामुळे रेल्वे वाहतुकीलासुद्धा फटका बसला आहे. सोलापूर विभागातील रेल्वे गाड्यांचा वेग सीना नदीवरील पुलावर 30 किमी प्रतितास इतका कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर करमाळा तालुक्यात मुंडेवाडी इथं पाणी रेल्वे पुलाजवळ पोहोचले आहे.

दरम्यान, मागील चार दिवसांपासून सोलापूरमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यात कोळेगाव येथील धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे सीना नदीचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला. अनेक पूल पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे खबरदारीमुळे महामार्ग बंद करण्यात आला आहे. पावसामुळे शेताला नदीचे स्वरूप आले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय. त्यात आता महामार्गही ठप्प झाल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.







