लोणी काळभोर, ता. 29 : लग्नासाठी सजवलेली कार घेण्यासाठी गेलेल्या तरुणाला मद्यधुंद इसमाने मारहाण करीत ‘माझ्यावर सात मर्डरच्या केसेस आहेत, तुझ्या लग्नाच्या ठिकाणी येऊन तुला मारून टाकेन,’ अशी धमकी दिल्याची घटना घडली. कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील हनुमान मंदिरासमोरील श्री समर्थ फ्लावर्स अँड डेकोरेटर्स येथे गुरुवारी (ता. 26) पहाटे सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

याप्रकरणी अक्षय मोहन त्रिंबके (वय 31, रा. कुंजीरवाडी, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय त्रिंबके हे खासगी कंपनीत आयटी इंजिनिअर म्हणून काम करतात. गुरुवारी पहाटे ते आणि त्यांचा मित्र अक्षय तोंडकर हे मारुती सुझुकी कारमधून लग्नासाठी सजावट केलेली किया कार घेण्यासाठी कदमवाकवस्ती येथील श्री समर्थ फ्लावर्स अँड डेकोरेटर्स येथे गेले होते.

तेथे पोहोचल्यानंतर एका मद्यधुंद अनोळखी व्यक्तीने त्यांच्याकडे हडपसरला सोडण्याची मागणी केली. मात्र, ते थेऊरला जाणार असल्याचे सांगून त्यांनी नकार दिला. त्यानंतर संबंधित व्यक्तीने शिवीगाळ सुरू केली. त्रिंबके यांनी दुर्लक्ष करून सजावटीची गाडी पाहण्यासाठी पुढे गेले, तर त्यांचा मित्र अक्षय तोंडकर कारमध्ये बसला होता. संबंधित मद्यधुंद व्यक्ती तोंडकर यांच्यामागे लागून त्यांनाही हडपसरला सोडण्याचा आग्रह करू लागला.
त्रिंबके यांनी मित्राला त्रास देऊ नको, असे सांगितल्यावर संबंधित व्यक्तीने शिवीगाळ करत दारूची बाटली उगारून अंगावर धाव घेतली. त्याने हाताने व नाकावर मारहाण केली. त्रिंबके कारमध्ये बसल्यानंतरही आरोपीने दरवाजा उघडून त्यांच्या चेहऱ्यावर मारहाण केली. त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्रिंबके यांच्या डाव्या मांडीला चावा घेतला.
दरम्यान, उपस्थित असलेले दुकानाचे मालक सागर वाल्टे, त्यांची पत्नी आणि दोन कामगार यांनी संबंधित व्यक्तीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्रिंबके यांनी कारमधून बाहेर पडून पोलिसांच्या 112 हेल्पलाइनवर संपर्क साधला. त्यावेळी आरोपीने दगड फेकून मारला आणि ‘माझ्यावर सात मर्डरच्या केसेस आहेत, तुझ्या लग्नाच्या ठिकाणी येऊन तुला मारून टाकेन,’ अशी धमकी दिली. त्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला.
मानेवर ‘ध्रुव’ नावाचे टॅटू
तक्रारीत आरोपीचे वर्णन गोऱ्या रंगाचा, डोक्याच्या दोन्ही बाजूंना टक्कल असलेला आणि मानेच्या उजव्या बाजूला ‘Dhruv’ असे इंग्रजी अक्षरांत गोंदवलेले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.






