Solapur News : सोलापूर : राज्यात शाळांना दिवाळी सणाच्या १४ दिवस सुट्या आहेत. या दीर्घ मुदतीच्या सुट्यांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी पाच तालुक्यात विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जाणार आहे. जिल्ह्यातील सांगोला, माळशिरस, माढा, करमाळा व बार्शी या दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जाणार आहे. शासकीय व अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनाच हा पोषण आहार दिला जाणार आहे.
यात पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ४५० उष्मांक व १२ ग्रॅम प्रथिनेयुक्त आणि सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ७०० उष्मांक व २० ग्रॅम प्रथिनेयुक्त माध्यान्ह भोजन दिले जाते. सध्या तांदळापासून बनवलेला भात हा आहार मिळतो. दरम्यान, अंड्यातील पौष्टिक मूल्यांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळावा, यासाठी व अंडी उत्पादक शेतकऱ्यांना राज्यांतर्गत स्थानिक बाजारपेठ मिळावी म्हणून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत पोषण आहारात अंड्याचा समावेश करण्याचा निर्णय मंगळवारी शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याला दर बुधवारी किंवा शुक्रवारी आहारासोबतच शिजवलेले एक अंडे दिले जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९५ शाळा तर ‘माध्यमिक’च्या अनुदानित एक हजार ५४ शाळांमधील आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. त्याशिवाय शालेय पोषण आहारामध्ये केळीचा समावेश करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे चांगले दिवस येणार आहेत. केळी उत्पादक शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त केला जात आहे. वर्षातील २३ आठवडे अंडी व केळी देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे. तर जे विद्यार्थी शाकाहारी आहेत किंवा ज्यांना अंडी खाण्याची इच्छा नाही, अशा विद्यार्थ्यांना केळी देण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांच्या केळीला स्थानिक बाजारपेठेत कायम मागणी राहणार आहे. केळीला चांगला दर मिळण्यासाठी याचा फायदा होणार असल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.
अंड्यात उच्च प्रतिचे प्रथिने, उष्मांक, जीवनसत्त्वे, लोह, कॅल्शिअम, कार्बोहायड्रेड असतात. त्यामुळे अंड्याचा आहारात समावेश केल्यास विद्यार्थ्यांची वाढ व रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल, असा विश्वास सरकारला आहे. दुसरीकडे अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना केळी किंवा स्थानिक फळ दिले जाणार आहे. त्याच्या नोंदी ठेवल्या जातील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.