अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर शनिवार सात ऑक्टोबर रोजी प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात कुलकर्णी यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. सध्या उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. मात्र, या हल्ल्याप्रकरणी अद्यापही पोलिसांनी कोणावरही कारवाई न केल्याने सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत.
दरम्यान, या हल्ल्याविषयी हेरंब कुलकर्णी यांच्या पत्नी प्रतिमा कुलकर्णी यांनी फेसबुक पोस्ट करत माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हेरंब कुलकर्णी हे शनिवारी शाळा सुटल्यावर आपले सहकारी शिक्षक सुनील कुलकर्णी यांच्या गाडीवरून घरी जात होते. त्यावेळी वाटेत रासने नगर परिसरात जोशी क्लासेसजवळ दुपारी 12:18 वाजता सराईत गुन्हेगारांनी हेरंब कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला जखम होऊन चार टाके पडले. तसेच सहकारी सुनील कुलकर्णी यांच्या हाताला मार लागला आहे.
तसेच प्रतिमा कुलकर्णी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 48 तास होऊन गेल्यानंतरही पोलिसांनी कोणालाही अटक केली नाही. सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तीला रस्त्यात अडवून रॉड ने जीवघेणा हल्ला करणे, हे खूप उद्विग्न करणारे आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे. या हल्ल्याप्रकरणी हेरंब कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, आतापर्यंत पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. यामुळे अहमदनगरमधील सामाजिक संघटना यासंदर्भात आज पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहेत.
हेरंब कुलकर्णी यांच्या पत्नीची पोस्ट:
हेही वाचा:
New Delhi : मध्य प्रदेश, राजस्थानसह पाच राज्यांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर