सातारा : श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातून देण्यात येणारा मानाचा शिव सन्मान पुरस्काराची घोषणा झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार वितरण सोहळा येत्या 19 फेब्रुवारीला आयोजित करण्यात आला आहे. सैनिक स्कूल ग्राउंड सातारा येथे भव्य दिव्य असा हा सोहळा पार पडणार आहे.
पंतप्रधान 3 वेळा महाराष्ट्र दौ-यावर
श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले महाराज हे पुरस्कार सोहळ्याचे निमंत्रक आहेत. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 वेळा महाराष्ट्र दौ-यावर येण्याची शक्यता आहे. 5, 11 आणि 19 फेब्रुवारीला मोदी महाराष्ट्रात येणार असल्याचं बोललं जातं आहे. 5 फेब्रुवारीला जळगाव, 11 फेब्रुवारीला यवतमाळ आणि 19 फेब्रुवारीला पुणे, नागपूर असा दौरा करण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदी यवतमाळमध्ये महिला बचत गटाच्या मेळाव्याला संबोधित करतील तर नागपुरात भाजपच्या अनुसूचित जाती आघाडीतील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करतील.
लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची तयारी असल्याचे बोलले जात आहे. मुंबईत भाजप 5 हजार नमो वॉरियर्स तयार करणारे. भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून नमो वॉरियर्स म्हणून त्यांची निवड होईल. पहिल्या टप्प्यात 100 महाविद्यालयांतल्या 18 ते 21 वयोगटातील विद्यार्थ्यांना संधी मिळणारेय. प्रत्येक महाविद्यालयातल्या 50 तरुण-तरुणींची निवड होणारेय. युवा वॉरियर्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी असणारेय.