शिर्डी : श्री साईबाबा संस्थान ट्रस्टने राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या मदतीसाठी एक कोटी रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे.

गेल्या काही दिवसांत राज्याच्या विविध भागांत, मुसळधार पाऊस झाल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पुरात अनेकांचे संसार पाण्यात गेले आहेत तर अनेक शेतकऱ्यांची उभी पिके पुराच्या पाण्यात पूर्णपणे नष्ट झाली आहेत. अशापरिस्थितीत शेतकरी व सामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत. याच पार्श्वभूमीवर साईबाबांच्या भक्तांकडून मिळालेल्या देणगीतून सामाजिक बांधिलकी जपत संस्थानने हा मोठा मदतीचा हात पुढे केला आहे.

जाहीर करण्यात आलेली ही 1 कोटी रुपयांची मदत तातडीने मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये जमा करण्यात येणार आहे. या मदतीमुळे राज्य सरकारला पूर आणि अतिवृष्टीग्रस्तांना मदत करण्यास बळ मिळणार आहे. शिर्डी साईबाबा संस्थानसोबतच, शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानने देखील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 1 कोटी 11 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
दरम्यान, आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना आणि पूरग्रस्त नागरिकांना यामुळे नक्कीच आधार मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.







