पंढरपुर: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी खासदार शरद पवार हे पायाला भिंगरी लावून राज्यातील अनेक जिल्ह्यात फिरत आहेत. शुक्रवारी शरद पवारांनी सोलापूर दौऱ्यात माळशिरस आणि पंढपुरमध्ये सभा घेतल्या. या सभेत शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच सध्या मोदींकडून जातीय तेढ निर्माण करणारी भाषणे केली जात असल्याचा आरोप देखील पवार यांनी केला. दरम्यान, शरद पवारांनी शनिवारी सकाळी पंढरपुरात जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेतले आहे. यावेळी, यावेळी पंढरपुरमधील राष्ट्रवादी काँग्रसचे नेते अभिजीत पाटील हेही त्यांच्यासमवेत उपस्थित होते.
पवार पंढरपूर दौऱ्यावर असताना ते पांडुरंगाच्या दर्शनाला जातील की नाही, यावरुनही मोठ्या अटकली लढवल्या जात होत्या. मात्र, शरद पवारांनी शनिवारी सकाळी विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेतले.यावेळी अभिजीत पाटील यांच्याबरोबर स्थानिक नेतेही उपस्थित होते. दरम्यान, 15 मार्चपासून पुढील दीड महिन्यांसाठी विठ्ठलाचे पायावरचे दर्शन म्हणजे गाभाऱ्यातून दर्शन घेणे बंद आहे.तसेच दिवसभरात सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत असे फक्त पाच तास मुखदर्शनाची सुविधा उपलब्ध आहे. मंदिराच्या गाभाऱ्याची दुरुस्तीसाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शरद पवार यांनी मुखदर्शन घेतले.