सोलापूर: लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या नसल्या तरी राज्यात महाविकास आघाडीकडून बैठकांचा सपाटा मात्र जोरात सुरु आहे. सोमवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक पंढरपूर येथील श्रेयस पॅलेसमध्ये होणार आहे. या बैठकीत सोलापूर, माढा या दोन लोकसभा मतदारसंघाच्या जागांसह पश्चिम महाराष्ट्रातील इतर जागांची चाचपणी होणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे. या बैठकीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटालाही निमंत्रित करण्यात आले असून त्यांच्याकडून या बैठकीला कोण येणार याबाबत उत्सुकता आहे.
सोमवारी राजचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे दोघेही माढा तालुक्यात येणार आहेत. तसेच अजित पवार यांना काही मराठा आंदोलकांनी माढा प्रवेश बंदीचा इशारा दिला आहे. सोमवारी सकाळी शरद पवार हे हेलिकॉप्टरने पावणे दहा वाजता माढा तालुक्यातील कापसेवाडी येथे येणार असून तिथे ते द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा घेणार आहेत. या मेळाव्यानंतर ते दुपारी बारा वाजता पंढरपूर येथे येणार असून काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे हे देखील बारा वाजता सोलापूरहून पंढरपूरला पोहचणार आहेत.त्यांनतर या दोघांच्या उपस्थितीत श्रेयस पॅलेस येथे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यासोबत लोकसभा निवडणुकीसाठी बैठक होणार आहे. या बैठकीला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनाही निमंत्रित केले असले तरी नेमके या बैठकीला कोण येणार हे अद्याप समजू शकले नाही .
उमेदवार कोण याबाबत चाचपणी होणार
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून यंदा आमदार प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारीची चर्चा सुरु आहे. तर माढा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदारसंघ असल्याने येथील उमेदवारीबाबत चाचपणी होणार आहे. सध्या हे दोन्ही मतदारसंघ भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असून माढ्यातील शरद पवार यांचे सहकारी अजित पवार यांच्यासोबत गेल्याने कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत चाचपणी होणार आहे.
हेही वाचा
Pune News : नॅशनल कराटे तायक्वांदो स्पर्धेत डोर्लेवाडीतील शिवतेज जाधवला सुवर्ण..