संगमनेर : अहमदनगर जिल्ह्यातील संगमेर शहर पोलीस ठाण्याच्या कारागृहाचे गज कापून चार कैदी पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली. ८ नोव्हेंबरला सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार सुरक्षारक्षकांच्या निर्दशनास आल्याने खळबळ उडाली. या घटनेने पोलिस प्रशासनाचे धाबे दणाणून गेले आहेत. पळून जाणारे चारही आरोपी सराईत असून गंभीर गुन्ह्यांमध्ये न्यायालयीन कोठडीत होते. त्यामुळे फरार झालेल्या आरोपींच्या शोध घेण्याकरिता पाच पथके रवाना केल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी दिली आहे. रोशन थापा ददेल, अनिल ढोले, राहुल देविदास काळे आणि मच्छिंद्र जाधव अशी फरार झालेल्या कैद्यांची नावे आहेत.
शहरातील पोलिस ठाण्याला लागूनच कारागृह बनविण्यात आले आहे. कोपरगाव कारागृहाचे काम सुरू असल्यामुळे कोपरगाव आणि शिर्डीमधील मोठ्या गुन्ह्यातील अनेक कैदी संगमनेरच्या कारागृहात ठेवण्यात आले आहेत. या कारागृहात सध्या अत्याचार तसेच खून आणि आत्महत्या करण्यास प्रवृत्त तसेच वेवेगळ्या गुन्ह्यातील कैदी ठेवले आहेत. दरम्यान कारागृहातील कैदी झोपेत असताना कारागृहाचे गज कापून पलायन केले.
यावेळी संगमनेर कारागृहाच्या बंदोबस्तासाठी बुधवारी पहाटेपर्यंत जेल गार्ड म्हणून शहर पोलिस ठाण्याचे राजू गोडे, घारगावचे पोलिस कर्मचारी राजेंद्र मेंगाळ आणि महिला पोलिस कर्मचारी भांगरे यांची कारागृह रक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. पोलिस कर्मचाऱ्यांनी मंगळवारी रात्री कैद्यांची संख्या मोजली असता बरोबर होती. मात्र सकाळी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास अन्य कैदी गाढ झोपेत असताना चार कैद्यांनी कारागृहाचे गज कापून पलायन केले. या घटनेने पोलिस दलात एकाच खळबळ उडाली आहे.
चार सुरक्षाकारक्षक निलंबीत
बुधवारी पहाटेपर्यंत जेल गार्ड म्हणून शहर पोलिस ठाण्याचे राजू गोडे, पोलिस राजेंद्र मेंगाळ आणि महिला पोलिस भांगरे यांची कारागृह रक्षक म्हणून ड्युटीवर होते. दरम्यान कारागृहातील कर्मचारी साखरझोपेत होते. त्यामुळे एकाच वेळी चार कैद्यांनी पलायन केले. यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याप्रकरणी पोलिस अधीक्षकांनी ड्यूटीवरील चार सुरक्षाकारक्षकांना निलंबीत करण्याचे आदेश काढले आहेत.