फलटण: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरोधात उघडपणे आघाडी उघडणारे अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. याबाबत आजच (दि. ५) रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडून मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार रामराजे नाईक निंबाळकर हे शनिवारी रात्री फलटण येथील खटके वस्तीवर कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. या मेळाव्यात रामराजे नाईक निंबाळकर हे कार्यकर्त्यांशी बोलून त्यांच्याच कलाने निर्णय देखील घेतील, अशी माहिती आहे. परंतु, रामराजे यांनी अजित दादांच्या घड्याळाची साथ सोडून तुतारी हाती घेण्याचा निर्णय पक्का केल्याची चर्चा आहे. रामराजे यांच्यासोबतच फलटणचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण देखील अजित पवार यांची साथ सोडणार, असे सांगितले जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात नुकतीच फोनवरुन आमदार दीपक चव्हाण यांची विधानसभेची उमेदवारी जाहीर केली होती. आता त्यानंतरही चव्हाण यांनी राष्ट्रवादी सोडल्यास हा अजित पवार यांच्यासाठी दुहेरी धक्का ठरेल.