कोल्हापूर : गतवर्षातील तुटलेल्या ऊसाला प्रतिटन चारशे रुपये द्या तसेच यंदाच्या उसाला पहिली उचल साडेतीन हजार रुपये द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन करत आहे. तर साखर कारखानदार ही मागणी मान्य करत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून एल्गार सुरु आहे. दिवसेंदिवस हे आंदोलन उग्र होत आहे. दरम्यान, या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून बोलावण्यात आलेली बैठक निष्फळ ठरल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी पुणे-बंगळूर महामार्गावर कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन सुरू केले आहे.
जिल्ह्यातील कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यातील तिसरी बैठक निष्फळ ठरल्यानंतर, आम्ही आमच्या मागणीवर ठाम असून मागणी मान्य न झाल्यास चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा यापूर्वीच राजू शेट्टी यांनी दिला होता. याशिवाय ऊसतोडी देखील बंद राहणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटले होते. आता स्वाभिमानीकडून बेमुदत चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. राजू शेट्टी यांनी 2005-06 मध्ये देखील आपल्या मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी हायवे रोखून साखरसम्राटांना दर देण्यासाठी भाग पाडले होते.
दरम्यान, करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी हायवेवर चक्का जाम आंदोलन सुरु केले आहे. या वेळी कारखानदार आणि सरकारचे संगनमत झाल्याचा आरोप त्यांनी केला. विरोधी पक्षांनी सुद्धा डोळेझाक केल्याचा आरोप त्यांनी केला. शेट्टी यांनी सर्व कारखाने बंद असल्याचा दावा केला. दुसरीकडे, आंदोलनाची तीव्रता कमी व्हावी म्हणून शिरोळ आणि जयसिंगपूरमधील संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आंदोलनामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथून तळंदगे फाटा-हातकणंगले-जयसिंगपूर-इस्लामपूर-पेठ नाका येथून पुण्याकडे जाण्यास वाहतूक वळवण्यात आली आहे. कोल्हापुरातून बेळगावकडे जाण्यासाठी कसबा बावडा-कोल्हापूर शहर शिवाजी विद्यापीठ मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे. अनूचित प्रकार टाळण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
सारखर कारखाने आणि सरकारशी वाटाघाटी निष्फळ ठरल्याने राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. या संदर्भात राजू शेट्टी म्हणाले की, आमची मागणी ही साखर कारखाने आणि सरकारने मान्य केलेली नाही. कारखाने जर आम्हाला योग्य दर देण्यास तयार नसतील, तर आम्ही त्यांना गुडघे टेकायला लावू. यासाठी हे आंदोलन केले जाणार आहे. हे आंदोलन शांततेत केले जाणार आहे. जोपर्यंत सरकार यावर मार्ग काढत नाही, तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन सुरूच ठेवणार आहोत. पोलीस देखील अलर्ट झाले आहेत. हे आंदोलन मोडून काढण्यासाठी मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार असून आंदोलकांची आणि शेतकरी संघटनेच्या नेत्यांची आंदोलनापूर्वी धरपकड करण्यात येत आहे. मात्र, मिळेल त्या मार्गाने महामार्गावर येण्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.
राजू शेट्टी यांनी आंदोलनाला प्रारंभ होण्यापूर्वी सांगितले की, शरीरात रक्ताचा थेंब असेपर्यंत शेतकऱ्यांसाठी लढत राहणार आहे. आमच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतलं आहे. मात्र, शेतकरी भावांनो मिळेल त्या वाटेने पोलिसांना चुकून महामार्गावर या. सरकार आणि साखर कारखानदारांना गुडघे टेकायला लावू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिला आहे.