सोलापूर : विविध अस्मानी संकटांवर मात करत बार्शी तालुक्यातील गुळपोळी, सुर्डी, मालवंडी परिसरात द्राक्ष हंगाम सुरू झाला आहे. बेदाणा हंगामाच्या सुरुवातीलाच बेदाण्याच्या दरातही वाढ झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
गत वर्षातील फेब्रुवारी महिन्यापेक्षा यंदाच्या फेब्रुवारी व मार्च महिन्यात बेदाणा दरात 50 ते 75 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे बेदाण्याला 175 ते 225 रुपये प्रतीकिलो असा दर मिळत असल्याचे बेदाणा उत्पादक शेतकरी गणेश म्हेत्रे व नागेश बारवकर यांनी सांगितले.
बार्शी तालुक्यासह परिसरात यंदा द्राक्षाची छाटणी मागे पुढे झाल्याने द्राक्ष विक्री आणि बेदाणानिर्मिती करण्यास या भागातील शेतकरी पुढे आले आहेत. त्यामुळे गुळपोळीसह परिसरात बेदाणा हंगाम सुरू झाला असून बेदाणानिर्मितीस गती आली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गतवर्षी अवकाळी पावसाने द्राक्षाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे बेदाण्याच्या उत्पादनात सुमारे ३० टक्के घट झाली होती. बेदाण्याच्या उत्पादनात घट होऊन बेदाण्याचे भाव 100 ते 125 रुपयांपर्यत आले होते, अशी माहिती प्रगतशील शेतकरी भागवत चिकणे व लक्ष्मण काळे यांनी दिली.
अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि ढगाळ वातावरणानेही द्राक्ष शेतीला मोठा फटका बसला आहे. वातावरणाचा फटका सहन करत जतन केलेल्या द्राक्ष पिकापासून बळीराजा मोठ्या उत्पन्नाची आपेक्षा ठेवून आहे. द्राक्षाचा दर्जा, औषधे, खते, मजुरी यावर चालू वर्षी आतोनात खर्च झाल्याने द्राक्षाला चांगला दर मिळावा, किमान खर्च व उत्पन्नाचा ताळमेळ तरी बसावा अशी अपेक्षा माजी ग्रामपंचायत सदस्य शिरीष चिकणे व प्रवीण चिकणे यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, मागील वर्षी बेदाण्याला चांगला भाव मिळाला नव्हता. त्यामुळे उत्पादन खर्चही शेतकऱ्यांच्या अंगावर आला होता. प्रति किलो सरासरी 110 ते 130 रुपयांचा दर मागील वर्षी मिळाला होता. पण चालू वर्षीही या प्रमाणातच बेदाण्याचा दर असल्याने शेतकऱ्यांना दराची चिंता आहे. मागील वर्षापेक्षा यंदा द्राक्षांचे उत्पादन कमी आहे. अवकाळी पाऊस व खराब हवामानामुळे द्राक्ष बागांचे खूप नुकसान झाले होते. त्यामुळे उत्पादन कमी असल्याने बेदाण्याच्या दरात वाढ होईल, असा अंदाज शेतकरी योगेश चिकणे व बापू म्हेत्रे यांनी व्यक्त केला आहे.
याबाबत बोलताना प्रगतशील शेतकरी धनाजी मचाले म्हणाले, “मागील वर्षी बेदाणा दर पडल्याने आमचे खूप नुकसान झाले. चालू वर्षी द्राक्ष उतारा कमी आहे. अवकाळी व खराब हवामानामुळे द्राक्ष शेतीचे खूप नुकसान झाले होते. यावर्षी तरी बेदाण्याला चांगला दर मिळेल अशी आशा आहे.”