अहमदनगर (Ahmednagar): विसाव्या वर्षापासून दरवेळी ग्रामपंचायत निवडणूक लढवली, पण प्रत्येक वेळी मतदारांनी त्यांना आस्मान दाखवलं. पण गडी थकला नाही, शेवटी 32 वर्षानंतर निवडणूक पठ्ठ्याने निवडणूक जिंकली आणि थेट सरपंचपदी विराजमान झाला. अहमदनगर जिल्ह्यातील अरणगावचे नूतन सरपंच पोपट पुंड यांना तब्बल 32 वर्षांनी सरपंच पद मिळाल आहे. त्यानंतर अवघ्या गावाने एकच जल्लोष केला.
अहमदनगर जिल्ह्यातील अरणगावचे नवनिर्वाचित सरपंच पोपट पुंड यांनी वयाच्या 20 व्या वर्षी पहिली निवडणूक लढली होती, मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडली. त्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतच्या प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी नशीब आजमावलं. कधी ग्रामपंचायत तर कधी पंचायत समिती निवडणुक लढवली. पण तब्बल 32 वर्षे अपयश येत राहिले. मात्र, सोमवारी वयाच्या 51 वर्षी त्यांचे निवडणुकीतील अपयशाचं ग्रहण सुटलं आणि ते थेट सरपंचपदी निवडून आले. त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
अरणगाव ग्रामपंचायतीत माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते शिवाजी कर्डीले यांच्या समर्थकांची सत्ता गेली अनेक वर्षे होती. तर, पोपट पुंड हे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचे समर्थक आहेत. त्यांनी वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी गावचे सरपंच व्हायचे म्हणून स्वप्न पाहिले. त्यांनी 2002 ला पंचायत समिती तर 2014 मध्ये सरपंच होण्यासाठी निवडणूक लढवली. पण, प्रत्येकवेळी त्यांना काही मतांनी पराभवाला सामोरे जावे लागत होते. पराभव पहावा लागत असला तरी पुंड यांनी जिद्द सोडली नाही. गावामधील लोकसेवेची कामे पोपट पुंड यांच्याकडून सुरू होती, लोकांशी संपर्क नियमित ठेवला होता.
32 वर्षांनी निवडून येण्याचं स्वप्न सत्यात उतरल्यानतंर पोपट पुंड हे खूप आनंदी आहेत. लोकांनी दिलेल्या जबाबदारीची जाणीव ठेऊन गावचा विकास करणे हेच ध्येय असल्याचं पुंड यांनी सांगितलं आहे.