लहू चव्हाण
पाचगणी : पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथील पाचगणी पोलिस ठाण्याने यावर्षी दुसऱ्यांदा सर्वात जास्त दोषसिद्धी प्राप्त करून सर्वोत्कृष्ट दोषसिद्धी पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. संपूर्ण जिल्ह्यात सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या हस्ते पाचगणी पोलीस ठाण्याचे प्रभारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांच्यासह अमलदारांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. या पुरस्काराने पाचगणी पोलिस ठाण्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्ह्यांना प्रतिबंध करणे यासाठी विविध ठाण्यांमधील निकोप स्पर्धा वाढीस लागावी आणि दोषसिद्धी यात सुधारणा व्हावी. दिलेल्या मर्यादेत उत्कृष्ट रितीने काम करणे तसेच गुन्हेगारीला प्रतिबंध आणि गुन्हा तपास आदी हेतू साध्य करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या कामकाजाचा सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख (भापोसे) हे प्रत्येक महिन्यात आढावा घेतात.
त्यामध्ये सर्वोत्कृष्ट कार्य पार पाडलेल्या पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी तसेच अंमलदारांचा प्रमाणपत्र, पुरस्कार देऊन गौरव करतात. ऑगस्ट 2023 या महिन्यात पाचगणी पोलीस स्टेशनने सर्वात जास्त दोषसिद्धी प्राप्त करून संपूर्ण जिल्ह्यात सर्वोत्तम कामगिरी केली होती. नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेल्या दोषसिद्दी मध्ये पाचगणी पोलिस स्टेशन दुसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट ठरले आहे. त्याबद्दल पाचगणी पोलीस ठाण्याचे प्रभारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांच्यासह अमलदारांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.