लहू चव्हाण
पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील राजपुरी गुव्हेतील श्री कार्तिक स्वामी दर्शन योग २६ व २७ नोव्हेंबर असा दोन दिवस होणार आहे. या अनुषंगाने होणाऱ्या गर्दीमुळे भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम, पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांनी आढावा घेतला.
पौर्णिमा व कृतिका नक्षत्र येत्या रविवारी (ता. २६) दुपारी ३.५४ वाजल्यापासून सोमवारी (ता. २७) रोजी दुपारी १.३५ वाजेपर्यंत एकत्र आहे. या योगावर कार्तिक स्वामी दर्शन यात्रा होणार आहे. यानिमित्ताने येणाऱ्या भाविकांच्या वाहनतळाची व्यवस्था, गुव्हे येथील मंदिरात खाली उतरण्यासाठी पायऱ्यांवर सुरक्षेच्या दृष्टीने बॅरीकेड लावणे, स्त्री-पुरुषांची वेगळी रांग करणे, गुव्हे येथे परिसरात योग्य प्रकाश व्यवस्था ठेवणे आदींचा आढावा या वेळी घेण्यात आला. या वेळी बाळासाहेब भालचिम व राजेश माने यांनी पुजारी व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
दर्शनाचा लाभ घेण्याचे राजपुरी ग्रामस्थांचे आवाहन
कार्तिक स्वामींचे वाहन हे मयूर म्हणजेच मोर आहे. यादिवशी श्री कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊन दर्भ, चंदन, फुले, दशांगधूप आणि दीप अर्पण केला जातो. या वेळी श्री कार्तिकेय स्रोताचे पठण केले जाते. त्यामुळे मनातील नकारात्मक विचार नष्ट होतात आणि बौद्धिक शक्ती वाढते. भाविकांनी २६ व २७ नोव्हेंबर या दोन दिवशी कार्तिक स्वामी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन राजपुरी ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे यांनी केले.