satara news : पाचगणी ( सातारा ) : जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या महाबळेश्वर-पाचगणी मुख्य मार्गाची दयनिय अवस्था झाली आहे. मुख्य मार्गाच्या दुतर्फा कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे अस्वच्छतेचा अंधार पसरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कचऱ्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना होण्याबाबत पर्यावरण प्रेमी नितीन भिलारे यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना पाचगणी भेटीदरम्यान विनंती केली.
पाचगणी- महाबळेश्वर मुख्य रस्त्यावर अंजुमन हायस्कूल ते भिलार वऑटर फठल आहे. त्या दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचे साम्राज्य वाढत आहे. त्यामुळे मुख्य रस्त्याचे विद्रुपीकरण होत असून, प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. प्रवाशांना नाक धरून प्रवास करावा लागत आहे. हा कचरा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्याचबरोबर पांगारी, भोसे, भिलार, गुरेघर, अवकाळी, मेट गुताड या गावांच्या हद्दीतील मुख्य रस्त्यावर कचऱ्याचे ढिगच्या ढीग दिसू लागले आहेत.
पाचगणी- महाबळेश्वर मुख्य रस्त्याच्या या दुरावस्थेबाबत नितीनभाई भिलारे यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी सपत्नीक पाचगणी फेस्टिवला आले असता यांच्याकडे ही समस्या मांडली. भिलारे म्हणाले प्रशासनाने यात त्वरित लक्ष दिले नाही तर स्वच्छ सर्वेक्षणात नावलौकिक असलेल्या पाचगणी-महाबळेश्वर प्रतिमा मलीन होणार आहे.