सोलापूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशीपूजा, चंदनउटी पूजा मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पूजेची नोंदणी करण्यासाठी मंदिर समितीने संगणक प्रणाली विकसित केली आहे. भाविकांना आता एक ऑक्टोबरपासून ऑनलाईन पद्धतीने पूजेची नोंदणी करता येणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे .
मंदिर समितीच्या २० ऑगस्टच्या सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत हा निर्णय घेण्यात आला होता. ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्याचे काम पूर्ण झाले आहे. भाविकांना पूजेची नोंदणी https://www.vitthalrukminima ndir.org/ या मंदिर समितीच्या संकेतस्थळावर करता येणार आहे.
दि. ७ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या कालावधीतील सण, उत्सव व गर्दीचे दिवस वगळून इतर दिवशी श्री विठ्ठलाच्या नित्यपूजा, तुळशीपूजा व पाद्यपूजा ऑनलाईन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी काही अडचणी आल्यास मंदिर समितीच्या नित्योपचार कार्यालयातून नोंदणी करून देण्यास मदत व आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
याबाबतची अधिक माहिती, अटी व शर्ती मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी मंदिर समितीच्या ०२१८६-२९९२९९ या दूरध्वनी क्रमांकावर भाविकांनी संपर्क साधण्याचे आवाहनही शेळके यांनी केले आहे.