लहू चव्हाण
पाचगणी : मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे. यापासून कुणीही वंचित राहू नये, यासाठी पाचगणी नगरपरिषद हद्दीतील सर्व नवमतदार युवकांनी मतदारयादीत आपले नाव समाविष्ट करून घ्यावे, असे आवाहन पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदचे मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल जाधव यांनी केले.
मतदारांचे नाव व पत्ता चुकीचा असेल, त्यांनीही दुरुस्ती करून घ्यावी. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या सर्व नव मतदारांनी आपल्या नावाची मतदार यादीमध्ये नोंदणी करण्यासाठी मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे २७ डिसेंबरअखेर जमा करावे.
या वेळी बोलताना निखिल जाधव म्हणाले की, १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या नवीन मतदारांनी लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार यादीमध्ये नावे नोंदवावीत. मतदार नावनोंदणीसाठी जन्म पुरावा, शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड, रहिवासी दाखला, आधार कार्ड झेरॉक्स, पासपोर्ट आकाराची दोन छायाचित्रे आदी कागदपत्रांसह मतदारांनी आपले नाव नोंदवावे.