अहिल्यानगर: शिर्डीत दोघांची निर्घुण हत्या झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शिर्डी विमानतळा नजीक काकडी शिवारातील गुंजाळवस्ती येथे घडली आहे. साहेबराव भोसले (वय 60) व कृष्णा भोसले (वय 30) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरी करण्याच्या हेतूने ही घटना घडली असा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेतील मृतात वडील व मुलाचा समावेश आहे तर आई गंभीर जखमी झाली आहे. घरातील सामान विस्कटलेल्या अवस्थेत आढळले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, या हत्याकांडामुळे शिर्डीत एकच खळबळ उडाली आहे.