सांगली: केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्र सरकारच्या विविध योजना राज्यात प्रभावीपणे राबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीत सांगलीचे खासदार विशाल पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीत सर्वपक्षीय लोकसभा सदस्य व राज्यसभा सदस्यांचा समावेश आहे. या निमित्ताने विशाल यांना केंद्र शासनाने महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
केंद्र सरकारच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील यंत्रणांत समन्वय व राखण्याचे काम या समितीमार्फत केले जाईल. या आधीची समिती सन २०२१ ला नियुक्त करण्यात आली होती. ती बरखास्त करून ही नवीन समिती मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आली.
केंद्र सरकारच्या योजना गतीने राबवणार
खासदार विशाल पाटील म्हणाले, केंद्र सरकारच्या ग्रामीण विकासाबद्दल योजना सुयोग्य पद्धतीने आणि गतीने राबवण्यासाठीचे काम ही समिती करत असते. केंद्र सरकार महाराष्ट्रातील ग्रामीण विकासासाठी अधिकाधिक निधी देईल. महाराष्ट्राबाबत दुजाभाव होणार नाही.