अहिल्यानगर : राज्यात विधानसभा निवडणुकांचे मतदान पार पडले. अशातच एक बातमी समोर आली आहे. बाहेर हुल्लडबाजी सुरू असल्याने स्वतःला एका शाळेच्या खोलीत बंद करून घेतलेल्या भाजपच्या आमदार आणि पाथर्डीच्या उमेदवार मोनिका राजळे यांना पोलिसांकडून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे. बूथ कॅप्चरिंगची माहिती मिळाल्यानंतर आपण शिरसाठवाडी या ठिकाणी गेलो असता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जमावाने हुल्लडबाजी सुरू केल्याचा आरोप त्यांनी राजळे यांनी केला. त्यानंतरच मोनिका राजळे यांनी स्वतःला शाळेच्या एका खोलीमध्ये बंद करून घेतल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या पाथर्डी शहरात तणावपूर्ण वातावरण बघायला मिळत आहे. शिरसाठवाडी येथील हुल्लडबाज जमावापासून स्वतःला वाचण्यासाठी मोनिका राजळे यांनी शाळेच्या वर्गखोलीत स्वतःला बंद करून घेतले होते. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांना शाळेच्या खोलीतून बाहेर काढण्यात आलं असल्याची माहिती मिळत आहे.
…म्हणून स्वतःला कोंडून घेतलं
शिरसाठवाडी येथे बूथ कॅप्चरिंग होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर भाजप आमदार मोनिका राजळे या तेथे भेट देण्यासाठी गेल्या होत्या. त्यानंतर त्यांच्यावर जमाव चालून आल्याचा दावा त्यांनी केला. हा मोठा जमाव असल्याने मोनिका राजळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह स्वतःला एका खोलीमध्ये बंद करून घेतलं. त्यानंतरही संबंधित खोलीच्या बाहेर मोठा जमाव होता. तसेच त्याठिकाणी पोलिस बंदोबस्त कमी असल्याने मोनिका राजळे या बाहेर येण्यास तयार नव्हत्या. त्यांनी दूरध्वनीवरून पोलिसांशी संपर्क करत मदत मागवली. बाहेर असणारा जमाव हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचा असल्याचा त्यांनी दावा केला. थोड्या वेळानंतर पोलिस आले आणि त्यांनी मोनिका राजळे यांची सुटका केली आणि त्यांना पोलिस सुरक्षेत त्या ठिकाणाहून नेण्यात आले.
जमावाकडून दगडफेक.. : मोनिका राजळे
जमावाकडून आपल्यावर दगडफेक केल्याचा आरोप मोनिका राजळे यांनी यावेळी केला आहे. संबंधित मतदान केंद्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न जमावाने केल्याचा आरोपही राजळे यांनी केला आहे. याबाबत माहिती मिळताच मोनिका राजळे या तात्काळ मतदान केंद्रावर पोहचल्या होत्या. मात्र मतदान केंद्राबाहेरील जमावाने त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत दगडफेक केल्याचा आरोप राजळे यांनी केला आहे.