कोल्हापूर : प्रत्येक दुकानांवर मराठी पाट्या लावण्यात याव्यात, या मागणीसाठी सोमवारी कोल्हापुरात मनसेनेआक्रमक भूमिका घेतली. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी इंग्रजीतील फलकांना काळे फासले. काही ठिकाणी फलकांची मोडतोड केल्याने वादाचा प्रसंग उद्भवला. सर्वोच्च न्यायालयाने प्रादेशिक भाषेत फलक लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मनसेचे नेते राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार आज कोल्हापुरात हे आंदोलन हाती घेतले.
शहराच्या विविध भागात फिरत जय महाराष्ट्र अशा घोषणा देत मनसैनिकांनी दुकानांवरील इंग्रजी पाट्या काळे फासत पुसून काढल्या. काही ठिकाणी त्याची मोडतोड केली. आजचे हे प्राथमिक स्वरूपातील इशारा देणारे आंदोलन आहे. दुकानदारांकडून आठवड्याभरात बदल न झाल्यास एकही इंग्रजी फलक जागी ठेवला जाणार नाही, असा इशारा शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले व जिल्हा सचिव प्रसाद पाटील यांनी दिला.