माढा : सलग सहा वेळा मोठ्या मताधिक्क्याने माढा विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले राष्ट्रवादीचे जेष्ठ आमदार बबनदादा शिंदे यांनी अजितदादांसह महायुतीला रामराम ठोकला आहे. तसेच यावेळी निवडणुकीतून माघार घेत ते आपल्या मुलाला निवडणूक रिंगणात उतरवत आहेत. यासंदर्भात त्यांनी शरद पवारांची अनेक वेळा भेट घेतली आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर शरद पवार यांची भेट घेत रणजीत शिंदे यांच्यासाठी उमेदवारी मागितली आहे. जर साहेबांनी उमेदवारी दिली नाही, तर आपण मुलाला अपक्ष उभा करू अशी भूमिका आमदार शिंदे यांनी घेतली आहे. यानंतर आता अजितदादांसह महायुतीच्या अडचणीत वाढ होणार आहे. महायुतीतील तुमचं फिक्स तिकीट का नाकारत आहात? या प्रश्नावर त्यांनी तो विषय आता संपलेला आहे, अशा एका वाक्यात उत्तर देत अजितदादा व महायुतीला निरोप दिला.
तुमचे पुतणे धनराज शिंदे हे बंडखोरी करत असल्याचे निदर्शनास आणून देताच आमचा घरचा विषय देखील संपला असल्याचे आमदार बबन शिंदे यांनी सांगितले. तसेच भारतीय जनता पक्षाचे आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील देखील तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्याचा प्रयत्नात आहे. याबाबत बोलताना, निवडणुकीत कोणीही समोर येऊ दे, त्याचा आम्हाला फरक पडणार नाही, असं आमदार शिंदे यांनी स्पष्ट केली. आता आमदार शिंदे यांनी मुलासाठी शरद पवारांकडे उमेदवारी मागितल्याने अजित पवार यांना माढ्यात कोणाला उभे करायचे हा प्रश्न पडणार आहे.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील राजकारणाने चांगलाच वेग घेतला असून माढा, मोहोळ, करमाळा आणि पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात चुरशीच्या लढतींपूर्वीच उमेदवारीवरुन चांगलीच रस्सीखेच होताना दिसत आहे.