सातारा : ना वशिला, ना ओळख, थेट मिळते मदत हे ब्रीद घेऊन मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष सुरु करण्यात आला होता. या कक्षाच्या माध्यमातून मागील 2 वर्षाच्या कालावधीत रुग्णांच्या उपचारासाठी सुमारे 275 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. तर 35 हजारहून अधिक रुग्णांचे प्राण वाचले आहे. तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढलं आहे. त्याची सुरुवात शाळकरी वयामध्ये होते. मुलं एनर्जी ड्रिंक पितात आणि मग हळूहळू व्यसनाधीनतेकडे जातात. एका जागतिक अहवालानुसार सन 2050 पर्यंत जगातल्या एकूण लोकसंख्येपैकी 50 टक्के म्हणजे निम्म्या लोकांना कॅन्सर होईल. त्यामुळे तरुणांनी व्यसनांपासून दूर रहावे. असे आवाहन मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी केले आहे.
सातारा येथील शासकीय विश्रामगृहात नुकतीच एक पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मंगेश चिवटे यांनी नागरिकांना वरील आवाहन केले. पुढे बोलताना मंगेश चिवटे म्हणाले, अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडीच्या कार्यकाळात वैद्यकीय मदत कक्ष मृतावस्थेत होता; परंतु सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारभार हाती घेतल्यानंतर त्यांच्या दक्षतेमुळे रुग्णांना विनाविलंब मदत मिळत आहे.
या योजनेमधून कॉकलियर इम्प्लांट, हृदय प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, किडणी प्रत्यारोपण, फुप्फुस प्रत्यारोपण, बोन मॅरी प्रत्यारोपण, हाताचे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, अपघात शस्त्रक्रिया, लहान बालकांची शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, – हृदयरोग, डायलिसीस, कर्करोग किमोथेरपी/रेडिएशन, खुब्याचे प्रत्यारोपण नवजात शिशुचे आजार, गुडघ्याचे प्रत्यारोपण, बर्न रुग्ण, विद्युत अपघात रुग्ण यांना मदत केली जाते.
दरम्यान, यामध्ये दुर्धर रोगांवरील उपचार, विविध अवयवांचे प्रत्यारोपण यासाठी एक लाख रुपयांपर्यंत मदत देण्यात येते. यासाठी विहीत अर्ज नमुन्यात, वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र, तहसीलदार कार्यालयाकडून मिळालेला वार्षिक उत्पन्नाचा दाखला, रुग्णाचे आधारकार्ड, रेशनकार्ड, आजाराचे रिपोर्ट, लहान बाळासाठी आईचे आधारकार्ड, अपघातग्रस्त रुग्णांसाठी पोलीस डायरी रिपोर्ट, प्रत्यारोपणासाठी शासकीय समितीची मान्यता आणि पेपर स्कॅन करून, पीडीएफ फाईल ईमेल आयडीवर पाठवणे, या अटींची पूर्तता करावी लागते. इतर आजारांसाठी कक्षाच्यावतीने 20 हजार रुपयांची मदत देण्यात येते.
एखादा रुग्ण उपचार न मिळाल्याने दगावू नये. यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष सुरु करण्यात आला आहे. या योजना पूर्णपणे मोफत असून रुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा. रुग्णांनी मदतीसाठी 8650567567 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा. संबंधित खाजगी रुग्णालयांमध्ये या योजनेत समाविष्ट होण्याची प्रक्रिया निःशुल्क आहे. रुग्णांनी कोणालाही मध्यस्थ न करता थेट टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन चिवटे यांनी केले आहे.
मंगेश चिवटे यांचे होतेय सर्वत्र कौतुक
मंगेश चिवटे यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर रुग्णांना त्वरित उपचार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहे. रुग्णांना त्यांच्या आजारपणात कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या मार्फत मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे अडीच वर्षाच्या कालावधीत 35 हजारहून अधिक रुग्णांचे प्राण वाचले आहे. म्हणून रुग्णांसाठी आरोग्यदूत असलेले मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.