सांगली : शहरातील एकाककडून चौघांनी रिल्व्हॉल्व्हरचा धाक दाखवून तब्बल १२ लाखांची खंडणी उकळली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अक्तरमिया नालसो शेख (वय ४९, रा. खोजा कॉलनी, सह्याद्रीनगर, सांगली) यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे. पोलिसांनी संशयित यासीन खलील इमानदार (रा. हडको कॉलनी, सांगली) आणि अन्य अनोळखी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १० ते १७ मे या कालावधीत घडला.
घटनेची माहिती अशी, संशयित यासीन इनामदार याने फिर्यादी अक्तरमिया शेख यांना भेटून त्यांना, तुला ठार मारण्याची सुपारी पुण्यातील एकाने घेतली असल्याचे सांगितले. तसेच शेख यांचे संशयित इमानदार याच्या मोबाईलमध्ये असलेले छायाचित्र देखील दाखविले. ज्यांनी सुपारी घेतली आहे, त्यांच्याशी कराड येथे संशयित यासीन इमानदार याने भेट घडवून आणली. सुपारी घेतलेल्यांनी फिर्यादी शेख यांच्याकडे ६० लाखांची मागणी केली. त्यानंतर १७ रोजी फिर्यादी शेख यांना जीवे मारण्याची धमकी देवून पाच जणांनी तुरची फाटा येथे त्यांच्याकडून १२ लाखांची खंडणी उकळली. अखेर फिर्यादी शेख यांनी सुमारे वीस दिवसांनंतर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली.