सांगली : भावाकडे तिरक्या नजरेने का पाहतोस, यावरून झालेल्या वादात दोघांनी शेतकऱ्यास काठी आणि दगडाने मारहाण केली. याबाबत जखमी पांडुरंग उर्फ विकास भगवान चव्हाण (वय ३३, रा. शिरगाव, ता. तासगाव) यांनी तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे. ही घटना ११ मे रोजी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास तासगाव ते विटा रस्त्यानजिक व उदगीर – शुगर कार्यालयानीजक घडली. पोलिसांनी संशयित रामचंद्र संजय पवार आणि शामराव संजय पवार (रा. बोरगाव फाटा, ता. तासगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
घटनेची माहिती अशी, फिर्यादी पांडुरंग चव्हाण हे त्यांच्या दुचाकीवरुन शिरगावकडे निघाले होते. त्यावेळी संशयित रामचंद्र पवार यांनी दुचाकी आडवी लावून फिर्यादीस थांबविले. तेथून जवळच असलेल्या उदगीर शुगर कार्यालयाच्या परिसरात फिर्यादीस नेले. तेथे त्याला भावाकडे तिरक्या नजरेने का पाहतोस? असे विचारुन त्याच्याशी वाद घातला. यावेळी संशयित शामराव पवार याने त्यांना माफी मागण्यास सांगितले. यावेळी दोघांनी फिर्यादी पांडुरंग चव्हाण त्यांना काठी आणि दगडाने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.