सांगली: माहेरी गेलेल्या पत्नीस आणण्यासाठी गेलेल्या पतीस पत्नीसह सासरा आणि मेहुण्याने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या वेळी मेहुण्याने त्याच्या हातावर चाकूने वार केले. ही घटना रविवार, ११ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास शहरातील पन्नास फुटी रस्त्यावरील बुद्रुक दवाखान्यानजिक घडली. यामध्ये जाविद रफिक जामकर (वय २८, रा. अलअमिन शाळेनजिक, चांदणी मोहल्ला, सांगली) हा जखमी झाला. याबाबत सांगली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी पत्नी मिनाज जाविद जामकर (वय २३), सासरे राजू शेख (वय ४५), मेहुणा शोहेब राजू शेख (वय २५) आणि फिरोज हवलदार (सर्व रा. पन्नास फुटी रस्ता, सांगली) यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी जाविद जामकर हे सेंट्रिग काम करतात. रविवारी सायंकाळी ते कामावरुन घरी आले असता त्यांची पत्नी मिनाज त्यांना घरी दिसली नाही. त्यामुळे जाविद यांनी पत्नी मिनाज यांना, तू कोणाबरोबर कोठे गेली होतीस? असे विचारले. या कारणावरुन दोघात भांडण झाल्याने पत्नी मिनाज शहरातच असलेल्या तिच्या माहेरी निघून गेली. काही वेळाने फिर्यादी जाविद हे मिनाजला घरी आणण्यासाठी तिच्या माहेरी गेले. त्यावेळी तिच्या घरात असलेल्या सासरे आणि मेहुण्याने जाविद बरोबर वाद घातला. मेहुणा शोहेब शेख याने त्याच्याजवळील चाकूने जाविद याच्या डाव्या हातावर वार केले. तर सासरे राजू शेख यांनी काठीने जाविदच्या पायावर आणि डोक्यात मारहाण केली. पत्नी मिनाज आणि मेहुणा फिरोज हवलदार यांनी जाविद यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये जाविद गंभीर जखमी झाला. पोलिसांनी अद्याप कोणासही अटक केलेली नाही.