सांगली: दारू पिऊन त्रास देत असल्याच्या कारणातून बापाने मुलावर कुऱ्हाड आणि चाकूने वार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना कर्नाळ (ता. मिरज) येथे घडली. या हल्ल्यात विनायक तातोबा नरळे (वय २६) हा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी सुनीता तातोबा नरळे (वय ४८, रा. वसंतदादा नगर, कर्नाळ, ता. मिरज) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीनुसार हल्लेखोर तातोबा नामदेव नरळे (वय ५०) यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
फिर्यादी सुनीता नरळे आणि संशयित तातोबा नरळे हे दोघे पती-पत्नी आहेत. जखमी विनायक नरळे हा त्यांचा मुलगा आहे. सर्वजण कर्नाळ (ता. मिरज) येथील वसंतदादा नगर येथे राहतात. बुधवार, ३१ जुलै रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास विनायक याने वडील तातोबा नरळे यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. तातोबा नरळे यांना मुलाच्या या कृत्याचा राग आला. त्यांनी विनायक यास ‘तू दररोज दारू पिऊन मला व माझ्या पत्नीला त्रास देतोस, तुला जिवंतच ठेवत नाही,’ असे म्हणून त्यांनी कुऱ्हाड आणि चाकूने विनायकवर हल्ला केला. त्याच्या पोटावर, छाती व पाठीवर वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. या हल्ल्यात विनायक हा गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.