सोलापूर, ता. १५ : माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी येथे घडलेल्या भीषण विहीर दुर्घटनेत आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण सोलापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. मात्र, या दुर्घटनेत स्थानिक युवक इरफान मुजावर आणि ग्रामस्थांनी दाखवलेल्या धाडसामुळे सात जणांचे प्राण वाचले. अपघाताच्या वेळी इरफान मुजावर हा पिकअपच्या पाठीमागून दुचाकीवरून येत होता. त्याच्या प्रसंगावधानामुळे अनेकांना जीवदान मिळाले. (Malshiraj Accident)

या दुर्घटनेत इंदुबाई दशरथ बावचे (वय ६०), पूजा अमोल सातोरे (वय २३), पूजा बालाजी बावचे (वय २७), अश्विनी संदीप बावचे (वय २७), संस्कार संदीप बावचे (वय १४), संस्कृती संदीप बावचे (वय १४), आरव अमोल सातोरे (वय ८) आणि समर्थ बालाजी बावचे (वय ६ महिने) यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील बावचे कुटुंबीय आणि त्यांचे नातेवाईक मिळून १५ जण पिकअप वाहनातून म्हसवड येथील सिद्धनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. अमावास्येनिमित्त दर्शन आटोपल्यानंतर दुपारच्या सुमारास ते गावाकडे परत निघाले. मात्र, म्हसवड-पंढरपूर मार्गावरील तांदूळवाडी गावाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि पिकअप रस्त्यालगतच्या पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळली. क्षणार्धात घडलेल्या या दुर्घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. वाहन विहिरीत उलट्या बाजूने पडल्याने प्रवाशांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही.

अपघाताच्या वेळी तांदूळवाडी येथील इरफान मुजावर हा युवक दुचाकीवरून पिकअपच्या मागेच येत होता. वाहन विहिरीत कोसळल्याचे पाहताच त्याने तत्काळ ग्रामस्थांना फोन करून मदतीसाठी पाचारण केले. दरम्यान, विहिरीतील पाण्यात एक लहान बाळ बुडताना दिसताच इरफानने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता विहिरीत उडी घेतली. त्याने चिमुकल्याला बाहेर काढून त्याच्या पोटात गेलेले पाणी बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवला.
त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने आणखी दोन लहान मुले, एक महिला आणि दोन पुरुषांना बाहेर काढण्यात आले. तसेच दोन जणांनी स्वतः पोहत बाहेर येऊन आपला जीव वाचवला. मात्र, वाहन उलट्या बाजूने विहिरीत कोसळल्यामुळे आतील भागात अडकलेल्या सात महिला आणि एका सहा महिन्यांच्या बालकाला वाचविण्यात अपयश आले. या दुर्घटनेत एकूण आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे रांजणी गावावर शोककळा पसरली असून संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेनंतर बोलताना इरफान मुजावर भावुक झाले. “समोर मृत्यू दिसत होता, पण जेवढे शक्य होते तेवढे प्रयत्न केले. काहींना वाचवता आले, मात्र वाहनात अडकलेल्या महिला आणि चिमुकल्याला वाचवता आले नाही, ही खंत आयुष्यभर राहील,” असे त्यांनी सांगितले. अपघातानंतर तांदूळवाडीतील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. दोर, ट्यूब आणि उपलब्ध साधनांच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्यात आले. स्थानिकांच्या तत्परतेमुळे आणखी मोठी जीवितहानी टळल्याचे सांगितले जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींवर सर्वोत्तम उपचार करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी एस. कार्तिकी यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताच्या त्रिस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच जिल्ह्यातील रस्त्यालगतच्या धोकादायक विहिरींचे सर्वेक्षण करून त्याठिकाणी संरक्षण कठडे उभारण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, माळशिरस येथील या दुर्घटनेने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले असले, तरी इरफान मुजावर आणि ग्रामस्थांनी दाखवलेले धाडस अनेकांसाठी आशेचा किरण ठरले आहे. मृत्यूच्या दाढेतून सात जणांना बाहेर काढणाऱ्या या तरुणाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.







