सातारा: सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील पाचुपतेवाडी येथे पुण्याच्या डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स (DRI) विभागाने एनडीपीएस कायद्यानुसार मोठी कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. या कारवाईत तब्बल 6 हजार कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. (pune dri)

विशेष म्हणजे, गेल्या एका महिन्यात सातारा जिल्ह्यातील ड्रग्जविरोधातील ही दुसरी मोठी कारवाई आहे. यापूर्वी डिसेंबर महिन्यात मुंबई पोलिसांनी सावरी गावात छापेमारी करून मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज जप्त केले होते.

पाचुपतेवाडी येथे झालेल्या या कारवाईदरम्यान डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सच्या पथकात तीन आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश होता. या ठिकाणी असलेला कारखाना महाराष्ट्र केसरी संजय पाटील खून प्रकरणातील प्रमुख आरोपी बाबा मोरे याचा असल्याची माहिती असून, त्याला ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.

‘डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स’ने या परिसरातील एक शेड सील केले असून, त्या ठिकाणी अंमली पदार्थांची निर्मिती केली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नेमके कोणते अंमली पदार्थ येथे तयार केले जात होते, याबाबत मात्र अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
दरम्यान, या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात मोठी चर्चा सुरू असून, राज्यातील ड्रग्ज नेटवर्कचा गंभीर पैलू पुन्हा एकदा समोर आल्याचे चित्र आहे.







